मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून, महायुतीने या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला आहे. एकूण १७ जागांपैकी तब्बल १६ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. मात्र, नाशिकमध्ये मात्र एका जागेवर अपक्ष उमेदवाराने महायुतीला धक्का दिला आहे. तर, विरोधी पक्षातील महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून त्यांच्या एकाही उमेदवाराला विजयाचे खाते उघडता आलेले नाही.
या निवडणुकीत एकूण १७ जागांसाठी मतदान होणार होते. मात्र, यातील ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला, यामध्ये रवींद्र फाटक (ठाणे), अनिकेत तटकरे (कोकण), विक्रम काकडे (पुणे), प्राजक्त तनपुरे (अहिल्यानगर), दुष्यंत चतुर्वेदी (यवतमाळ) आणि अरुण लखानी (वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर) यांचा समावेश आहे. उर्वरित ११ जागांसाठी १८ जून रोजी मतदान पार पडले, ज्यांचे निकाल आज जाहीर करण्यात आले. या निकालानुसार, भाजपने ११ जागा लढवल्या आणि सर्व जिंकल्या आहेत. शिंदेसेनेने ४ जागा लढवून ३ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) २ जागा लढवल्या आणि दोन्ही जागांवर विजय मिळवला. तर, एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली. या निवडणुकीत महाविकास आघाडी पूर्णपणे अपयशी ठरली असून त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.
नाशिकमध्ये महायुतीला धक्का
या निवडणुकीत सर्वात मोठी उलथापालथ नाशिक मतदारसंघात पाहायला मिळाली. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांनी महायुतीतील शिंदेसेनेचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत महायुतीला जोरदार धक्का दिला.
विजयी उमेदवारांची नावे
१) सुहास शिरसाट (भाजप)- छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघ
२) अविनाश ब्राह्मणकर (भाजप)- भंडारा-गोंदिया मतदारसंघ
३) धैर्यशील कदम (भाजप)- सांगली-सातारा मतदारसंघ
४) सय्यद खान (शिंदेसेना)- परभणी-हिंगोली मतदारसंघ
५) राजेंद्र राऊत (भाजप)- सोलापूर मतदारसंघ
६) बसवराज पाटील (भाजप)- धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघ
७) राजीव पोतदार (भाजप)- नागपूर मतदारसंघ
८) नंदकिशोर महाजन (भाजप)- जळगाव मतदारसंघ
९) प्रवीण पोटे (भाजप)- अमरावती मतदारसंघ
१०) अमर राजूरकर (भाजप)- अमर राजूरकर मतदारसंघ
११) गोकुळ गीते (अपक्ष)- नाशिक मतदारसंघ